Friday, 12 August 2016

मुक्काम दिसता



                                            मुक्काम दिसता । चालणे सरते
                                  वाट ही नुरते । पायांखाली..!

नाना चालीचिया वाढी। वाट होत जाय थोडी। मग पातला ठायीं बुडी। देऊनि निमे।। ११०२/१८
गाव जवळ आले की वाट थोडी उरते आणि पोचल्यावर बुडून नाहीशी होते

अद्वैत ज्ञान होऊ लागते तशी द्वैताची वाट संपत जाते आणि पूर्ण ज्ञान झाले की नाहीशी होते... हे समजावताना ही उपमा दिलेली आहे.

Sunday, 24 July 2016

सात्विक ते धैर्य..


संकल्प-विकल्प । फेडले लुगडे
निःशंक उघडे । केले मन..!
सात्विक ते धैर्य । आतून उगवे
बुद्धी-चंद्रामागे । उगी राही..!

जे जे आहे ते सर्व त्रिगुणात्मक आहे. याचे तपशीलवार वर्णन करताना सात्विक धैर्यासंदर्भात ही उपमा दिलेली आहे.

अधोर्ध्व गुढें काढी । प्राण नावाची पेंडी । बांधोनी घाली उडी । मध्यमेमाजी ॥
संकल्प-विकल्पांचें लुगडे । सांडूनि मन उघडें । बुद्धीही मागिलेकडे । उगीचि बैसे ॥ ७३९, ४० / १८

जे धैर्य प्राण..अपान.. आदि नऊ वायुंची जुडी करून नंतर सुषुम्नेमधे उडी घेते, संकल्प-विकल्पांचें वस्त्र उतरवून मन उघडे करते आणि बुद्धीच्या मागे जाऊन निवांत बसते.. असे धैर्य ते सात्विक धैर्य..!

Thursday, 21 July 2016

गर्जनेशिवाय..



गर्जनेशिवाय । वर्षाकाली धुंद
वर्षे मेघवृंद । सात्विकसा..!

कर्मेकराणारा सात्विक कर्ता कसा असतो ते सांगताना दिलेली उपमा-

परि फलशून्यता । नाहीं तया विफळता । पैं फळासीचि पांडुसुता । फळें कायसी ॥
आणि आदरे करी बहुवसें । परी कर्ता मी हे नुमसे । वर्षाकाळीचे जैसें । मेघवृंद ॥ ६३३, ३४/१८


नित्यनैमित्तिक कर्मे ही स्वतःच फलस्वरूप असतात. त्यामुळे ती निष्फळ होण्याचा प्रश्नच नाही. फळांनाच फळं असणं नसणं हे कसं शक्य होईल? वर्षाकालातील मेघवृंद गर्जना न करता बरसत असतात तसा सात्विक कर्ता गाजावाजा न करता कर्तव्यबुद्धीने नित्यनैमित्तिक कर्मे करत असतो. मी कर्ता हेही तो जाणत नाही..!

Saturday, 2 July 2016

वारा जाई दूर..


वारा जाई दूर । झाड ओलांडून
डोलणे ठेवून । फांद्यांवर..!

मी कर्मांचा कर्ता आहे असा अहंकार ज्याला नाही, जो यापासून अलिप्त आहे त्याचं स्वरूप समजावताना ही उपमा दिलेली आहे.

ऐसोनि अहंकृतिभावो । जयाचा बोधी जाहला वावो । तर्‍ही देहा जंव निर्वाहो । तंव आथी कर्में ॥ आगा वारा जरा वाजोनि वोसरे । तरी तो डोल रुखी उरे । कां सेंदे दृति राहे कापुरें । वेंचलेनी ॥ ४२२, २३ / १८

जसा वारा झाड पार करून दूर निघून गेला तरी त्यामुळे झाडाच्या फांद्यांमधे निर्माण झालेला कंप, त्यामुळे त्यांचे हलणे काही काळ मागे राहते किंवा डबीमधे ठेवलेला कापूर संपला तरी त्याचा गंध काही काळ डबीत रेंगाळत राहतो तसे स्वरूप ज्ञान झालेली व्यक्ती कर्म-प्रक्रियेपासून अलिप्त झाली तरी देह आहे तोपर्यंत त्याच्या असण्यामुळे कर्मे होतच राहतात..!

Monday, 27 June 2016

आकाश वर्षते..


आकाश वर्षते । डबकी बिंबते
तदाकार होते । असीम जे..!

कर्मं अखंड घडत असतात. कृष्ण त्यांची कारणं अर्जुनाला समजावून सांगत आहे. पहिलं कारण देह. दुसरं जीव. जीवाचं स्वरूप समजून देताना ही उपमा दिलेली आहे.

आणि कर्ता ते दुजें । कर्माचें कारण जाणिजे । प्रतिबिंब म्हणिजे । चैतन्याचें जें ॥ ३२१/१८
‘आकाशचि वर्षे नीर । तें तळवटीं बांधे नाडर । मग बिंबोनि तदाकार । होय जेवीं ॥ ३२२/१८’
तैसें आपुलेनि विसरें । चैतन्यचि देहाकारें । आभासोनी आविष्कारे । देहपणें जें ॥ ३२४/१८
जया विचाराचां देशीं । प्रसिद्धी गा जीवु ऐसी । जेणें भाक केली देहेंसीं । आघवाविषयी ॥ ३२५/१८

आकाश पर्जन्याचा वर्षाव करतं. त्याचं पृथ्वीवर डबकं तयार होतं. आणि असीम असलेलं आकाश डबक्याच्या आकाराचं होतं. तसे चैतन्य देहाकार धारण करून कर्मरूपात व्यक्त होत राहातं. आणि ‘स्व’रूपाचा विसर पडून ‘मी देह आहे’ असं मानू लागतं. अशी विपरित समजूत करून घेतलेले चैतन्य म्हणजे जीव. या जीवाने अवघी कर्मे करण्याबाबत देहाशी करार केलेला आहे..!

Sunday, 8 May 2016

निराकार जरी..


निराकार जरी । विश्वरूप घेई
परमाणू होई । गगन हे..!

दैवी संपत्ती असलेले गुण कोणते याचे वर्णन चालले आहे. त्यात मार्दव या गुणाचे स्वरूप समजावून सांगतांना दिलेली उपमा.

परी महाभूतें पोटीं वाहे । तेवींचि परमाणूमाजीं समाये । या विश्वानुसार होये । गगन जैसे ॥
काय सांगों ऐसें जिणें । जें जगाचेनि जीवें प्राणें । तया नांव म्हणें । मार्दव मी ॥ १७३ १७४ / १६

आकाश असीम आहे. पण ते पंचमहाभूते पोटात धारण करते तसे परमाणूरूपातही सामावते. ‘स्व’ मधे न आणता जसे विश्व आहे तसे ते होते. त्याप्रमाणे ‘स्व’ बाजूला ठेवून जीवमात्रांसाठी जगत राहणे या गुणाला मी मार्दव म्हणतो.

Saturday, 30 April 2016

देह अहंतेचे..


देह अंहतेचे । घरकुल सोडे
चिदाकाशी उडे । जीवपक्षी..!

सोळाव्या अध्यायाच्या सुरुवातीलाच ही उपमा आलेली आहे.
जेणे विवळतिये सवळे । लाहोनि आत्मज्ञानाचे डोळे । सांडिती देहाहंतेचीं अविसाळें । जीवपक्षी ॥ २/१६

नेहमीचा सूर्योदय विश्व उजेडात आणतो. एका अर्थी तो द्वैताचे दर्शन घडवतो. पण मायेच्या, अज्ञानाच्या रात्रीचा नाश करून आत्मज्ञानाचा सूर्य  उगवला की अध्यात्मज्ञानाचा दिवस उगवतो. अशा प्रातःकाळी आत्मज्ञानाची दृष्टी प्राप्त होऊन जीवपक्षी ‘मी म्हणजे देह’ या समजुतीचे घरटे सोडून देतात..

Friday, 22 April 2016

शाखा असे खूण..


शाखा असे खूण । कोर दाखवाया
तशा उपाधी या । खुणा त्याच्या


कृष्णार्जुन संवादात अर्जून कृष्णाला त्याच्या निरुपाधिक (ज्ञानेंद्रियांनी जाणता येईल अशी कोणतीही मिती नसलेल्या) शुद्ध रूपाविषयी प्रश्न करतो. तेव्हा कोणतीही उपाधी नसणं ही अवस्था समजून घेण्यासाठी उपाधींचा आधार कसा घ्यावा लागतो हे सांगताना दिलेली उपमा.

पै सांगण्याजोगे नव्हे । तेथींचे सांगणे ऐसें आहे । म्हणौनि उपाधि लक्ष्मीनाहें । बोलिजे आदीं ॥ पाडिव्याची चंद्ररेखा । निरुती दावावया शाखा । दाविजे तेवीं औपाधिका । बोली इया ॥ ४६९, ४७०/ १५
ते शुद्ध रूप शब्दांत वर्णन करून सांगण्याजोगे नाही. म्हणून ते काय नाही किंवा कशाने झाकले आहे असे उपाधींच्या, सगुणाच्या आधाराने सांगावे लागते. प्रतिपदेची बारीक चंद्रकोर वृक्षाच्या फांदीच्या आधाराने दाखवावी लागते त्याप्रमाणे माझे निरुपाधिक शुद्ध रूप अशा सगूण उपाधींच्या आधाराने समजून घ्यावे लागते.

Monday, 18 April 2016

सूर्यरश्मी जशा..


सूर्यरश्मी जशा भेदती मेघांस
ओलांडे देहास ज्ञानी तसा..!

ज्ञानचक्षू लाभलेले योगी नित्य आत्मभावात असतात हे सांगताना दिलेली उपमा-

ज्ञानें कां जयांचे डोळे । देखोनि न राहाती देहींचे खोळे । सूर्यरश्मी आणियाळे । ग्रीष्मीं जैसे ॥ ३८२ /१५ तैसी विवेकाचेनि पैसें । जयांची स्फूर्ती स्वरूपी बैसे । ते ज्ञानिये देखती ऐसें । आत्मयातें ॥ ३८३ / १५

ग्रीष्म ऋतूत सूर्याची किरणे जशी मेघांचा अडसर दूर करून प्रकाशतात तसे ज्ञानी लोक देहाचा मधला अडसर बाजूला करून नित्य आत्मस्वरूपच पाहतात. 

Thursday, 11 February 2016

निषिद्ध कर्माचे..


निषिद्ध कर्माचे । मूळ जसे वाढे
धावे पुढे पुढे । जन्मशाखा..!


संसाररूपी वृक्षाचं, त्याच्या विस्ताराचं वर्णन करताना दिलेली उपमा-

प्रतिपादिती अभिचार । आगम जे परमार । तेही पानीं घेती प्रसर । वासना वेली ॥
तंव तंव होती थोराडें । अकर्माचीं तळबुडें । आणि जन्मशाखा पुढें पुढें । घेती धाव ॥ १६७, ६८ / १५
जारणमारणादि निषिद्ध कर्मरूपातली मुळं मोठी होतील तसतशी वासनावेल विस्तारत जाते. त्यातून जन्मशाखा पुढे पुढे धाव घेत राहतात..

Wednesday, 3 February 2016

मेघ उपसती..


मेघ उपसती । समुद्राचे पाणी
नद्यांची भरणी । चालू राहे..!

खाली फांद्या आणि वर मुळे अशा विश्वरूपातील मायावी संसारवृक्षाचे स्वरूप समजावताना दिलेल्या उपमा-
जैसा मेघांचेनि तोंडें । सिंधु एकें अंगें काढे । आणि नदी येरीकडे । भरितीचि असती ॥ ११९/१५
तेथ वोहटे ना चढे । ऐसा परिपूर्णुचि आवडे । परी ते फुली जंव नुघडे । मेघांनदींची ॥ १२०/१५
ऐसे या रुखाचें होणेंजाणें । न तर्के होतेनि वहिलेपणें । म्हणौनि लोकु यातें म्हणे । अव्ययु हा ॥ १२१/१५
एकीकडून मेघ समुद्र उपसत राहतात तर दुसरीकडून नद्या भर घालत राहतात... त्यामुळे समुद्र कधी आटलाय किंवा ओसंडून वाहतोयसं दिसत नाही. सदैव पूर्ण भरलेला दिसतो. (पण ही स्थिती मेघ आणि नद्यांचे कार्य सुरळीत असते तोपर्यंतच...) त्याप्रमाणे पानगळ आणि बहर यांच्या आवर्तनांमुळे संसारवृक्ष अविनाशी आहे असे वाटते..

Sunday, 13 December 2015

अवस्थात्रयाने...


अवस्थात्रयाने । रूजतो वरती
विस्तारे खालती । विश्वाकार

विश्व-संसाराला अश्वत्थ वृक्षाची उपमा देऊन त्याची निर्मिती आणि विस्तार कसा होतो याचे सविस्तर वर्णन केले आहे...
ते ऊर्ध्व आत्मा निर्मळे । अधोर्ध्व सूचित मूळें । बळिया बांधोनि आळें । मायायोगाचे ॥
मग आधिली सदेहांतरे । उठती जिये अपारे । तें चौपासि घेऊनि आगारे । खोलावती ॥
ऐसे भवद्रुमाचें मूळ । हें ऊर्ध्वीं करी बळ । मग आणियांचें बेंचळ । अधीं दावी ॥ ९१,९२,९३/१५
ब्रह्मतत्त्व आणि माया यांच्या दृढ संबंधांचे आळे तयार होऊन त्यात या वृक्षाची निर्मिती होते. असंख्य देहरूपी अंकूर फुटून त्याचा अपार विस्तार होतो. अशा या संसारवृक्षाचे मूळ (माया) ते वरच्या बाजूस म्हणजे ब्रह्माच्या ठिकाणी रुजले की फांद्यांचा विस्तार सतत वाढत राहातो...

Tuesday, 8 December 2015

ऐल ओलांडुनी


ऐल ओलांडुनी । क्षितिजी पोचला
ऐल पैल झाला । एकाकार..!
एका ईश्वराखेरीज कोणताही विचार नाही अशी अव्यभिचारी उपासना करणारा भक्त त्रिगुणातीत अशा ब्रम्हत्वाशी पोचतो... हे समजावताना दिलेल्या उपमा-

जैसा सैंधवाचा रवा । सिंधूमाजीं पडावा । विरालेया विरवावा । हेंही ठाके ॥ ३९३/१४
नातरी जाळूनि तृण । वन्हिही विझे आपण । तैसे भेदु नाशूनि जाण । ज्ञान नुरे ॥ ३९४/१४
माझे पैलपण जाये । भक्त हे ऐलपण ठाये । अनादि ऐक्य जे आहे । तेंचि निवडे ॥ ३९५/१४

मीठ समुद्राच्या पाण्यात पडले तर ते असे एकरूप होते की मीठ तर वेगळे राहातच नाही पण ते विरघळले हेही उरत नाही. गवत जाळून मग अग्नीही विझतो तसे वेगळेपण नाहीसे करून ज्ञानही त्या ऐक्यात विलीन होते तेव्हा भक्त आणि ईश्वर यांच्यातील ऐल-पैलपण विरून सर्व एकाकार होते..!

Tuesday, 1 December 2015

अनेकधा झाले..


अनेकधा झाले । प्रतिबिंब जळी
वरून न्याहाळी । कल्लोळांना..!

त्रिगुणांच्या आधीन असलेला देह त्यांच्या प्रेरणांनुसार वर्तन करत असतो. ज्यावेळी ‘पुरुष’ द्रष्टा होऊन हे पाहतो तेव्हा तो गुणातीत स्व-रूप जाणू शकतो.. हे सांगताना दिलेली उपमा-

नातरी आपण जळी । बिंबलो तिरोनी न्याहाळी । चळण होता कल्लोळी । अनेकधा ॥ २८९/१४
तैसे गुणीं गुणापरौतें । जें आपणपें असे आयितें । तिये अहं बैसे अहंते । मूळकेचिये ॥ २९२/१४
तैं तेथुनि मग पाहता । म्हणे साक्षी मी अकर्ता । हे गुणचि क्रियाजातां । नियोजना ॥ २९३/१४

काठावरून पाहिले असता आपले प्रतिबिंब तरंगांमुळे विस्कटून गेलेले दिसते पण काठावरून अलिप्तपणे पाहिले असता बिंब आपल्या जागी स्थिर आहे हे लक्षात येते तसे त्रिगुणांमुळे स्व-रूप अनेकविध रूपात वर्तताना दिसत असले तरी ज्ञानी माणसाला सत् रूप स्थिर असते हे कळलेले असते.

Monday, 23 November 2015

घट फुटे तेव्हा..


घट फुटे तेव्हा । मुक्त घटाकाश
आकाशी आकाश । मिळतसे..!

स्वरूपज्ञान झालेल्या व्यक्तीला मद्‍रूपता(ईशरूपता) प्राप्त झालेली असते. या ऐक्याचे स्वरूप समजावताना दिलेली उपमा-
१)मी जैसा अनंतानंदु । जैसाचि सत्यसिंधु । तैसेचि ते भेदु । उरेचि ना ॥ ५३, जें मी जेवढे जैसे । तेंचि ते जाले तैसे । घटभंगी घटाकाशें । आकाश जेवीं ॥ ५४/१४
मी अमर्याद आनंद, सत्याचा समुद्र आहे तसेच ते (ज्ञानी) आहेत. आमच्यात काही भेद नाही. घट फुटल्यावर घटाकाश जसे महाकाश होते तसे, ज्ञानप्राप्तीमुळे आपला वेगळेपणा जे विसरले ते मी जसा जेवढा तसेच झालेले असतात.
२)घटाचिया खापरिया । घटभंगी फेडिलिया । महदाकाश आपैसया । जालेंचि असे ॥ ३१६/१४

Sunday, 8 November 2015

आरशात बिंब


आरशात बिंब । दिसे, परी नसे
देहामध्ये तसे । आत्मतत्त्व..!

देह आणि आत्मा यांचं अदृश्य नातं परोपरीनं समजावताना दिलेली उपमा-
आरिसा मुख जैसे । बिंबलिया नाम असे । देहीं बसणे तैसे । आत्मतत्त्वा ॥ १०९६/१३
एवंरूप पै आत्मा । देहीं जें म्हणती प्रियोत्तमा । ते मठाकारे व्योमा । नाम जैसें ॥ १११४/१३
आरशात चेहरा आहे असं म्हणता येत नाही. त्याला प्रतिबिंब म्हणतात. देहातील आत्म्याचं असणं आरशातील या प्रतिबिंबासारखं आहे. असा आत्मा देहात आहे असं म्हणणं म्हणजे मठाच्या आकारातील आकाशाला मठाकाश म्हणण्यासारखं आहे.

Monday, 2 November 2015

गळणे फुलणे..


गळणे फुलणे । नित्य चालतसे
वृक्ष साहतसे । जन्मदुःख..!

ज्ञानी माणसातील अहंभाव- ‘मी आहे’ याची जाणीव नाहिशी होते. त्याला असण्याचा, देहाकारात असण्याचा तिटकारा वाटू लागतो. गतजन्मांच्या विदारक स्मृतींनी पुन्हा जन्माला आल्याचे दुःख होते.. हे सांगताना परोपरीच्या, अंगावर येतील अशा उपमा दिलेल्या आहेत.. त्यातली एक सुसह्य उपमा-
डोळा हरळ न विरे । घायी कोत न जिरे । तैसे काळीचे न विसरे । जन्मदुःख ॥ ५३८/१३
डोळ्यात खडा किंवा जखमेत काटा खुपत राहातो तसे ज्ञानी माणसाला जन्मदुःख सलत राहाते..

Saturday, 31 October 2015

नभ मेघांतळी


नभ मेघांतळी । पथ पायांतळी
तरू स्थीर मुळीं । ज्ञानी जसा..!

गुरूकृपेविषयी विस्तारानं सांगून झाल्यावर ज्ञानी माणसाच्या स्थिरतेविषयी, धैर्याविषयी सांगितले आहे. ते सांगताना दिलेल्या उपमा-
जातया अभ्रासवे । जैसे आकाश न धावे । भ्रमणचक्री न भंवे । ध्रुव जैसा ॥ ४८८/१३
पांथिकाचिया येरझारा । सवें पंथु न वचे धनुर्धरा । कां नाही जेवी तरुवरा । येणे जाणे ॥४८९/१३
तैशा आल्या गेल्या ऊर्मी । नव्हे गजबज मनोधर्मी । किंबहुना धिरु क्षमी । कल्पांतीही ॥४९८ /१३
ढगांबरोबर आकाश धावत नाही, ग्रह-तार्‍यांच्या भ्रमणचक्रात ध्रुवतारा फिरत नाही, पथिक जात येत असतात पण पायांखालचा रस्ता स्थिर असतो, बाजूचे वृक्ष स्थिर असतात.. तसा ज्ञानी इंद्रियांच्या ऊर्मींच्या गजबजाटातही स्थिरचित्त असतो.

Friday, 30 October 2015

गाभ्यात पोकळ


गाभ्यात पोकळ । फळून भरते
मग उन्मळते । केळीबाई..!

ज्ञानी माणसाचे मन इतके तरल होते की त्याला आपल्या असण्याचाही संकोच वाटतो. त्याच्यातील ‘अदंभ’भावाविषयी सांगताना दिलेल्या उपमा- शेतकरी जसा पेरलेल्या बीजांवर पांघरूण घालतो तसे तो आपले दानपुण्य इ. सर्व झाकून ठेवतो. दुसरी उपमा-
केळींचे दळवाडें । हळू पोकळ आवडे । परि फळोनिया गाढें । रसाळ जैसे ॥ २१२/१३
केळीचा गाभा हलका आणि पोकळ असतो तरी ती फळते आणि रसाने भरून जाते.. ज्ञानी माणूस ज्ञानरसाने भरलेला असूनही पोकळ, हलका राहातो..

Thursday, 29 October 2015

मुळांना खालती


मुळांना खालती । सापडले पाणी
सांगे आबादानी । वरतून..!

अगा वृक्षासि पाताळी । जळ सापडे मुळीं । ते शाखांचिये बाहाळीं । बाहेर दिसे ॥ १७९/१३ तैसे हृदयीचेनि ज्ञानें । जियें देहीं उमटती चिन्हें । तियें सांगो आतां अवधानें । चांगे आइक ॥ १८३/१३

वृक्षाच्या मुळांना खाली पाणी सापडते ते आपल्याला दिसत नाही पण वरच्या फांद्यांच्या विस्तारावरून ते समजते. तसे ज्ञान ही डोळ्यांना दिसणारी गोष्ट नाही. पण ते प्राप्त झाले असता ज्ञानी माणसाच्या जगण्यात उतरते आणि ते त्याच्या वागण्यातून डोकावत राहते तेव्हा डोळ्यांनाही दिसू लागते. कसे ते पुढे सांगितले आहे.