Saturday, 31 October 2015

नभ मेघांतळी


नभ मेघांतळी । पथ पायांतळी
तरू स्थीर मुळीं । ज्ञानी जसा..!

गुरूकृपेविषयी विस्तारानं सांगून झाल्यावर ज्ञानी माणसाच्या स्थिरतेविषयी, धैर्याविषयी सांगितले आहे. ते सांगताना दिलेल्या उपमा-
जातया अभ्रासवे । जैसे आकाश न धावे । भ्रमणचक्री न भंवे । ध्रुव जैसा ॥ ४८८/१३
पांथिकाचिया येरझारा । सवें पंथु न वचे धनुर्धरा । कां नाही जेवी तरुवरा । येणे जाणे ॥४८९/१३
तैशा आल्या गेल्या ऊर्मी । नव्हे गजबज मनोधर्मी । किंबहुना धिरु क्षमी । कल्पांतीही ॥४९८ /१३
ढगांबरोबर आकाश धावत नाही, ग्रह-तार्‍यांच्या भ्रमणचक्रात ध्रुवतारा फिरत नाही, पथिक जात येत असतात पण पायांखालचा रस्ता स्थिर असतो, बाजूचे वृक्ष स्थिर असतात.. तसा ज्ञानी इंद्रियांच्या ऊर्मींच्या गजबजाटातही स्थिरचित्त असतो.

Friday, 30 October 2015

गाभ्यात पोकळ


गाभ्यात पोकळ । फळून भरते
मग उन्मळते । केळीबाई..!

ज्ञानी माणसाचे मन इतके तरल होते की त्याला आपल्या असण्याचाही संकोच वाटतो. त्याच्यातील ‘अदंभ’भावाविषयी सांगताना दिलेल्या उपमा- शेतकरी जसा पेरलेल्या बीजांवर पांघरूण घालतो तसे तो आपले दानपुण्य इ. सर्व झाकून ठेवतो. दुसरी उपमा-
केळींचे दळवाडें । हळू पोकळ आवडे । परि फळोनिया गाढें । रसाळ जैसे ॥ २१२/१३
केळीचा गाभा हलका आणि पोकळ असतो तरी ती फळते आणि रसाने भरून जाते.. ज्ञानी माणूस ज्ञानरसाने भरलेला असूनही पोकळ, हलका राहातो..

Thursday, 29 October 2015

मुळांना खालती


मुळांना खालती । सापडले पाणी
सांगे आबादानी । वरतून..!

अगा वृक्षासि पाताळी । जळ सापडे मुळीं । ते शाखांचिये बाहाळीं । बाहेर दिसे ॥ १७९/१३ तैसे हृदयीचेनि ज्ञानें । जियें देहीं उमटती चिन्हें । तियें सांगो आतां अवधानें । चांगे आइक ॥ १८३/१३

वृक्षाच्या मुळांना खाली पाणी सापडते ते आपल्याला दिसत नाही पण वरच्या फांद्यांच्या विस्तारावरून ते समजते. तसे ज्ञान ही डोळ्यांना दिसणारी गोष्ट नाही. पण ते प्राप्त झाले असता ज्ञानी माणसाच्या जगण्यात उतरते आणि ते त्याच्या वागण्यातून डोकावत राहते तेव्हा डोळ्यांनाही दिसू लागते. कसे ते पुढे सांगितले आहे. 

Wednesday, 28 October 2015

आभासी नीलिमा


आभासी नीलिमा । दिसे आकाशात
तसे शरीरात । वसे मन..!

क्षेत्राविषयी म्हणजे शरीराविषयी विस्ताराने सांगताना मनाच्या स्वरूपाचे वर्णन आले आहे-
‘जे इंद्रिया आणि बुद्धी । माझारिलिये संधी । रजोगुणाचा खांदी । तरळत असे ॥ नीळिमा अंबरी । का मृगतृष्णालहरी । तैसे वायांचि फरारी । वावो जाहले ॥ १०४, १०५/१३
इंद्रिये आणि बुद्धी यांच्या मध्यसंधीमधे रजोगुणाच्या खांद्यावर मन तरळत असते. आकाशाचा नीलिमा किंवा मृगजळाच्या लाटांप्रमाणे ते आभासी असते.

Tuesday, 27 October 2015

माळी नेतो तसे


माळी नेतो तसे । सुखे जाते पाणी
पेरणी रुजणी । माळी जाणे..!

ईश्वरप्राप्ती कशी करून घ्यावी याचे वेगवेगळे मार्ग समजावताना दिलेली उपमा-
करणें कां न करणें । हें आघवें तोचि जाणे । विश्व चळतसे जेणें । परमात्मेनि ॥ ११८/१२ माळिये जेउतें नेले । तेउते निवांतचि गेले । तया पाणिया ऐसे केलें । होआवें गा ॥ १२०/१२
माळी नेतो तसे विनतक्रार जाते पाणी.. त्याने काही केले असे होते का? तसे आपले जीवित अहंकार विरहित होऊन कर्म करणारे व्हावे. कारण ज्याच्या सत्तेने हे विश्व चालले आहे तो परमात्माच काय करायचं काय नाही हे जाणत असतो...

Monday, 26 October 2015

घरट्यात जीव


घरट्यात जीव । ठेवून पक्षिण
आकाशी भ्रमण । करतसे..!

घाबरलेल्या अर्जुनाला विश्वरूपाचं महत्त्व समजावून सांगताना दिलेली उपमा-
हें रूप जरी घोर । विकृति आणी थोर । तरी कृतनिश्चयाचें घर । हेंचि करी ॥ ६३२/११
का अजातपक्षिया जवळा । जीव बैसवूनि अविसाळा । पक्षिणी अंतराळा- । माजी जाय ॥ ६३४/११
पंख न फुटलेल्या पिलाजवळ जीव ठेवून पक्षिण आकाशात झेपावते तसा तू आपला जीव माझ्या विश्वरूपाजवळ ठेव आणि मग माझ्या मानवी रूपावर प्रेम कर. कारण विश्वरूप हेच माझे खरे रूप आहे.

Saturday, 24 October 2015

विश्वरूप तुझे


विश्वरूप तुझे । आवर आवर
पाहाया अधीर । कृष्णरूप..!

यालागी जी देवा । एथिंचे भय उपजतसे जीवा । म्हणोनि येतुला लळा पाळावा । जे पुरे हे आता ॥ पै चराचर विनोदे पाहिजे । मग तेणे सुखे घरी राहिजे । तैसे चतुर्भुज रूप तुझे । तो विसावा आम्हा ॥ ५९३, ५९४/११
विश्वरूप दर्शनाने भांबावलेला अर्जून कृष्णाला म्हणतो आहे, तुझे विराट रूप पाहून मी भ्यालो आहे.. आता माझं ऐक आणि तुझा हा स्वरूप-विस्तार थांबव. तुझे नेहमीचे साधे रूप हाच आम्हाला विसावा आहे.