Saturday, 30 April 2016

देह अहंतेचे..


देह अंहतेचे । घरकुल सोडे
चिदाकाशी उडे । जीवपक्षी..!

सोळाव्या अध्यायाच्या सुरुवातीलाच ही उपमा आलेली आहे.
जेणे विवळतिये सवळे । लाहोनि आत्मज्ञानाचे डोळे । सांडिती देहाहंतेचीं अविसाळें । जीवपक्षी ॥ २/१६

नेहमीचा सूर्योदय विश्व उजेडात आणतो. एका अर्थी तो द्वैताचे दर्शन घडवतो. पण मायेच्या, अज्ञानाच्या रात्रीचा नाश करून आत्मज्ञानाचा सूर्य  उगवला की अध्यात्मज्ञानाचा दिवस उगवतो. अशा प्रातःकाळी आत्मज्ञानाची दृष्टी प्राप्त होऊन जीवपक्षी ‘मी म्हणजे देह’ या समजुतीचे घरटे सोडून देतात..

Friday, 22 April 2016

शाखा असे खूण..


शाखा असे खूण । कोर दाखवाया
तशा उपाधी या । खुणा त्याच्या


कृष्णार्जुन संवादात अर्जून कृष्णाला त्याच्या निरुपाधिक (ज्ञानेंद्रियांनी जाणता येईल अशी कोणतीही मिती नसलेल्या) शुद्ध रूपाविषयी प्रश्न करतो. तेव्हा कोणतीही उपाधी नसणं ही अवस्था समजून घेण्यासाठी उपाधींचा आधार कसा घ्यावा लागतो हे सांगताना दिलेली उपमा.

पै सांगण्याजोगे नव्हे । तेथींचे सांगणे ऐसें आहे । म्हणौनि उपाधि लक्ष्मीनाहें । बोलिजे आदीं ॥ पाडिव्याची चंद्ररेखा । निरुती दावावया शाखा । दाविजे तेवीं औपाधिका । बोली इया ॥ ४६९, ४७०/ १५
ते शुद्ध रूप शब्दांत वर्णन करून सांगण्याजोगे नाही. म्हणून ते काय नाही किंवा कशाने झाकले आहे असे उपाधींच्या, सगुणाच्या आधाराने सांगावे लागते. प्रतिपदेची बारीक चंद्रकोर वृक्षाच्या फांदीच्या आधाराने दाखवावी लागते त्याप्रमाणे माझे निरुपाधिक शुद्ध रूप अशा सगूण उपाधींच्या आधाराने समजून घ्यावे लागते.

Monday, 18 April 2016

सूर्यरश्मी जशा..


सूर्यरश्मी जशा भेदती मेघांस
ओलांडे देहास ज्ञानी तसा..!

ज्ञानचक्षू लाभलेले योगी नित्य आत्मभावात असतात हे सांगताना दिलेली उपमा-

ज्ञानें कां जयांचे डोळे । देखोनि न राहाती देहींचे खोळे । सूर्यरश्मी आणियाळे । ग्रीष्मीं जैसे ॥ ३८२ /१५ तैसी विवेकाचेनि पैसें । जयांची स्फूर्ती स्वरूपी बैसे । ते ज्ञानिये देखती ऐसें । आत्मयातें ॥ ३८३ / १५

ग्रीष्म ऋतूत सूर्याची किरणे जशी मेघांचा अडसर दूर करून प्रकाशतात तसे ज्ञानी लोक देहाचा मधला अडसर बाजूला करून नित्य आत्मस्वरूपच पाहतात.