Saturday 31 October 2015

नभ मेघांतळी


नभ मेघांतळी । पथ पायांतळी
तरू स्थीर मुळीं । ज्ञानी जसा..!

गुरूकृपेविषयी विस्तारानं सांगून झाल्यावर ज्ञानी माणसाच्या स्थिरतेविषयी, धैर्याविषयी सांगितले आहे. ते सांगताना दिलेल्या उपमा-
जातया अभ्रासवे । जैसे आकाश न धावे । भ्रमणचक्री न भंवे । ध्रुव जैसा ॥ ४८८/१३
पांथिकाचिया येरझारा । सवें पंथु न वचे धनुर्धरा । कां नाही जेवी तरुवरा । येणे जाणे ॥४८९/१३
तैशा आल्या गेल्या ऊर्मी । नव्हे गजबज मनोधर्मी । किंबहुना धिरु क्षमी । कल्पांतीही ॥४९८ /१३
ढगांबरोबर आकाश धावत नाही, ग्रह-तार्‍यांच्या भ्रमणचक्रात ध्रुवतारा फिरत नाही, पथिक जात येत असतात पण पायांखालचा रस्ता स्थिर असतो, बाजूचे वृक्ष स्थिर असतात.. तसा ज्ञानी इंद्रियांच्या ऊर्मींच्या गजबजाटातही स्थिरचित्त असतो.

Friday 30 October 2015

गाभ्यात पोकळ


गाभ्यात पोकळ । फळून भरते
मग उन्मळते । केळीबाई..!

ज्ञानी माणसाचे मन इतके तरल होते की त्याला आपल्या असण्याचाही संकोच वाटतो. त्याच्यातील ‘अदंभ’भावाविषयी सांगताना दिलेल्या उपमा- शेतकरी जसा पेरलेल्या बीजांवर पांघरूण घालतो तसे तो आपले दानपुण्य इ. सर्व झाकून ठेवतो. दुसरी उपमा-
केळींचे दळवाडें । हळू पोकळ आवडे । परि फळोनिया गाढें । रसाळ जैसे ॥ २१२/१३
केळीचा गाभा हलका आणि पोकळ असतो तरी ती फळते आणि रसाने भरून जाते.. ज्ञानी माणूस ज्ञानरसाने भरलेला असूनही पोकळ, हलका राहातो..

Thursday 29 October 2015

मुळांना खालती


मुळांना खालती । सापडले पाणी
सांगे आबादानी । वरतून..!

अगा वृक्षासि पाताळी । जळ सापडे मुळीं । ते शाखांचिये बाहाळीं । बाहेर दिसे ॥ १७९/१३ तैसे हृदयीचेनि ज्ञानें । जियें देहीं उमटती चिन्हें । तियें सांगो आतां अवधानें । चांगे आइक ॥ १८३/१३

वृक्षाच्या मुळांना खाली पाणी सापडते ते आपल्याला दिसत नाही पण वरच्या फांद्यांच्या विस्तारावरून ते समजते. तसे ज्ञान ही डोळ्यांना दिसणारी गोष्ट नाही. पण ते प्राप्त झाले असता ज्ञानी माणसाच्या जगण्यात उतरते आणि ते त्याच्या वागण्यातून डोकावत राहते तेव्हा डोळ्यांनाही दिसू लागते. कसे ते पुढे सांगितले आहे. 

Wednesday 28 October 2015

आभासी नीलिमा


आभासी नीलिमा । दिसे आकाशात
तसे शरीरात । वसे मन..!

क्षेत्राविषयी म्हणजे शरीराविषयी विस्ताराने सांगताना मनाच्या स्वरूपाचे वर्णन आले आहे-
‘जे इंद्रिया आणि बुद्धी । माझारिलिये संधी । रजोगुणाचा खांदी । तरळत असे ॥ नीळिमा अंबरी । का मृगतृष्णालहरी । तैसे वायांचि फरारी । वावो जाहले ॥ १०४, १०५/१३
इंद्रिये आणि बुद्धी यांच्या मध्यसंधीमधे रजोगुणाच्या खांद्यावर मन तरळत असते. आकाशाचा नीलिमा किंवा मृगजळाच्या लाटांप्रमाणे ते आभासी असते.

Tuesday 27 October 2015

माळी नेतो तसे


माळी नेतो तसे । सुखे जाते पाणी
पेरणी रुजणी । माळी जाणे..!

ईश्वरप्राप्ती कशी करून घ्यावी याचे वेगवेगळे मार्ग समजावताना दिलेली उपमा-
करणें कां न करणें । हें आघवें तोचि जाणे । विश्व चळतसे जेणें । परमात्मेनि ॥ ११८/१२ माळिये जेउतें नेले । तेउते निवांतचि गेले । तया पाणिया ऐसे केलें । होआवें गा ॥ १२०/१२
माळी नेतो तसे विनतक्रार जाते पाणी.. त्याने काही केले असे होते का? तसे आपले जीवित अहंकार विरहित होऊन कर्म करणारे व्हावे. कारण ज्याच्या सत्तेने हे विश्व चालले आहे तो परमात्माच काय करायचं काय नाही हे जाणत असतो...

Monday 26 October 2015

घरट्यात जीव


घरट्यात जीव । ठेवून पक्षिण
आकाशी भ्रमण । करतसे..!

घाबरलेल्या अर्जुनाला विश्वरूपाचं महत्त्व समजावून सांगताना दिलेली उपमा-
हें रूप जरी घोर । विकृति आणी थोर । तरी कृतनिश्चयाचें घर । हेंचि करी ॥ ६३२/११
का अजातपक्षिया जवळा । जीव बैसवूनि अविसाळा । पक्षिणी अंतराळा- । माजी जाय ॥ ६३४/११
पंख न फुटलेल्या पिलाजवळ जीव ठेवून पक्षिण आकाशात झेपावते तसा तू आपला जीव माझ्या विश्वरूपाजवळ ठेव आणि मग माझ्या मानवी रूपावर प्रेम कर. कारण विश्वरूप हेच माझे खरे रूप आहे.

Saturday 24 October 2015

विश्वरूप तुझे


विश्वरूप तुझे । आवर आवर
पाहाया अधीर । कृष्णरूप..!

यालागी जी देवा । एथिंचे भय उपजतसे जीवा । म्हणोनि येतुला लळा पाळावा । जे पुरे हे आता ॥ पै चराचर विनोदे पाहिजे । मग तेणे सुखे घरी राहिजे । तैसे चतुर्भुज रूप तुझे । तो विसावा आम्हा ॥ ५९३, ५९४/११
विश्वरूप दर्शनाने भांबावलेला अर्जून कृष्णाला म्हणतो आहे, तुझे विराट रूप पाहून मी भ्यालो आहे.. आता माझं ऐक आणि तुझा हा स्वरूप-विस्तार थांबव. तुझे नेहमीचे साधे रूप हाच आम्हाला विसावा आहे.

Thursday 22 October 2015

दुःखकालिंदी


दुःखकालिंदीच्या । अतळ डोहात
नित्य बुडतात । कैक गाथा..!

विश्वरूप-दर्शन घडवताना चाललेला स्वरूप विस्तार पाहताना अर्जूनाला काय वाटलं त्याचं वर्णन करताना दिलेली उपमा-
हे बापडी लोकसृष्टी । मोटकीये विपाइली दिठी । आणि दुःखकालिंदीचा तटी । झाड होऊन ठेली ॥ ३४७/११
विश्वरूप-दर्शनाचा सोहळा चाललेला असताना दुःखकालिंदीच्या किनार्‍यावर संपूर्ण लोकसृष्टी झाड होऊन निश्चल उभी राहिलीय.. असं दिसलं.

Wednesday 21 October 2015

अमृताचा घनु


अमृताचा घनु । प्रत्यक्ष सावळा
पार्थ आसुसला । पावसाळा..!

तो कृपापीयूषसजळु । आणि येरु जवळा आला वर्षाकाळु । नाना कृष्ण कोकिळु । अर्जुन वसंतु ॥११३/११
कृष्ण म्हणजे कृपेच्या अमृताचा मेघ आणि अर्जुन जवळ आलेला वर्षाकाल, तो कोकिळ आणि अर्जुन वसंत.. असं दोघातलं नातं होतं..! त्याचं वर्णन करताना दिलेली उपमा...

Tuesday 20 October 2015

वर खाली आत


वर खाली आत । सर्वत्र बाहेर
नभ घरदार । मेघांसाठी..!

ईश्वराचे व्यापकत्व विभूतीयोगाने समजावून सांगताना दिलेली उपमा-

जैसे मेघां या तळीं वरी । एक आकाशचि आंत बाहेरी । आणि आकाशींचि जाले अवधारी । असणेंही आकाशी ॥ पाठी लया जे वेळी जाती । ते वेळी आकाशींचि होऊनि ठाती । तेवी आदि स्थिती अंतगती । भूतांसि मी ॥ २१७,२१८/१०

ढगांच्या खाली-वरती, आत-बाहेर आकाश असतं. ते तिथंच उत्पन्न होतात तिथेच राहतात आणि लय पावतात तेव्हा आकाशच होऊन जातात. त्याप्रमाणे सर्व प्राण्यांच्या उत्पत्ती स्थिती लयाला मीच आश्रय आहे.

Monday 19 October 2015

कमळ फुलता


कमळ फुलता । गंध ओसंडला
लपविता आला । नाही त्याला..!

जैसी कमळकळिका जालेपणे । हृदयीचिया मकरंदाते राखो नेणे । दे राया रंका पारणे । आमोदाचे ॥ तैसेनि मातें विश्वीं कथित । कथितेनि तोषें कथूं विसरत । मग तया विसरामाजीं विरत । आंगे जीवें ॥ १२७, १२८/१०
पूर्ण उमललेले कमळ आपला गंध लपवून ठेवू शकत नाही. राजा रंक सार्‍यांना त्याचा आनंद मिळतो. त्याप्रमाणे माझ्या भक्ताला भक्तीचा आनंद लपवता येत नाही.. माझे वर्णन करण्याच्या आनंदात त्याला सगळ्याचा विसर पडतो...

Saturday 17 October 2015

गंध जाई दूर


गंध जाई दूर । फूल उरे मागे
देठामधे जागे । आत्मभान..!

परिमळु निघालिया पवनापाठी । मागे वोस फुल राहे देठी । तैसे आयुष्याचिये मुठी । केवळ देह ॥ येर अवष्टंभु जो आघवा । तो आरूढोनि मद्भावा । मजचि आंतु पांडवा । पैठा जाहला ॥  ४१३, ४१४/९
गंध वार्‍यावर दूर निघून गेला तरी देठाची पकड असेपर्यंत फूल देठावर राहाते. तसे आत्मज्ञान झाल्यावर जगण्यासारखे काही उरलेले नसताना भक्ताचे आयुष्य त्याचा देह धरून ठेवते..! एरव्ही त्याचा देहाहंकार ईशरूपात केव्हाच स्थित झालेला असतो.

Friday 16 October 2015

विस्तार वडाचा


विस्तार वडाचा । वसे बीजामध्ये
आणि वडामध्ये । वसे बीज..!

भक्त आणि ईश्वर यांच्यातलं नातं समजावून सांगताना दिलेली उपमा-

सविस्तर वटत्व जैसे । बीजकणिकेमाजी असे । आणि बीजकणु वसे । वटी जेवी ॥ तेवीं आम्हां तया परस्परें । बाहेरी नामाचींचि अंतरे । वांचूनि आंतुवट वस्तु-विचारें । मी तेचि ते ॥ ४१०, ४११/९
संपूर्ण वटवृक्षाचा विस्तार त्याच्या बीजामध्ये असतो आणि वटवृक्षामध्ये बीज वसलेले असते तसे आम्ही परस्परांमध्ये सामावलेले असतो. बाहेर दिसणारे अंतर केवळ नामाचे असते.

Thursday 15 October 2015

विश्वपसारा



विश्वपसार्‍याची । जेवढी की व्याप्ती
तेवढी प्रतिती । ईश्वराची..!

 ‘आगा हे जेव्हडी माझी व्याप्ती । तेव्हडीचि तयाचि प्रतिति । ऐसे बहुधाकारी वर्तती । बहुचि होउनि ॥ हे भानुबिंब आवडेतया । सन्मुख जैसे धनंजया । तैसे ते विश्वा या । समोर सदा ॥  २५८,२५९/९

माझी जेवढी व्याप्ती तेवढी ते सर्व मीच ही प्रचिती येते. म्हणून ज्ञानी लोक अनेक होऊन मला एकाला जाणतात. सूर्यबिंब जसे प्रत्येकाच्या समोर असते त्याप्रमाणे ते नेहमी विश्वाच्या समोर असतात.

Wednesday 14 October 2015

दिव्यावर दिवा


दिव्यावर दिवा ।  दुसरा लावला
कोणता पहिला । कोणा कळे?

१) दीपु ठेविला परिवरीं । कवणातें नियमी ना निवारी । आणि कवण कवणिये व्यापारीं । राहाटे तेंहि नेणे ॥ १२८/९
प्रकृतीचा खेळ चालू असतो. ‘मी’(कृष्ण, ईश्वर) त्या सर्वाचा आधार आहे पण ‘मी’ काही करत नाही. जसा घरात लावलेला दिवा कुणाला काय कर, करू नको ते सांगत नाही. कोण काय करतं आहे हेही तो जाणत नाही. पण तो असतो म्हणून सर्व व्यापार घडतात..
२) जैसा दीपे दीपु लाविजे । तेथ आदिल कोण हे नोळखिजे । तैसा सर्वस्वे जो मज भजे । तो मी होऊनि ठाके ॥ ४२८/९
भक्त माझी भक्ती करता करता मीच होऊन जातो. मग भक्त कोण आणि ईश्वर कोण हे ओळखताच येत नाही. जसा दिव्याने दिवा लावला तर हा पहिला आणि हा दुसरा असा भेद राहात नाही. दोन्ही दिवे सारखेच असतात..
३) कां स्नेहसूत्रवन्ही । मेळू एके स्थानी । धरिजे तो जनीं । दीपु होय ॥ १५४/१३
तूप, वात आणि अग्नी एकत्र येऊन दिवा बनतो तशी अहंकार, बुद्धी, मन, पाच ज्ञानेंद्रिये पाच कर्मेंद्रिये, इच्छा, व्देष, सुख, दुःख, चेतना... इत्यादी छत्तीस तत्त्वे एकत्र येऊन शरीर (ज्ञानेश्वरीत क्षेत्र असं म्हटलं आहे) बनते...

Tuesday 13 October 2015

पाणी जरी गूढ


पाणी जरी गूढ । सज्ज आहे नाव
‘पल्याड’चे गाव । गाठावया..!

मणसासमोर नेहमी जगण्याचे दोन मार्ग असतात. एका मार्गाने ब्रह्मत्वास जाता येते. दुसर्‍या मार्गाने संसारचक्रात अडकावे लागते... हे मार्ग समजावून सांगताना ही उपमा दिलेली आहे-
‘पाहे पा नाव देखता बरवी । कोणी आड घाली काय अथावी । का सुपंथ जाणोनिया अडवी । रिगवत असे ॥’ २४०/८
समोर चांगली नाव दिसत असता कोणी अथांग पाण्यात उडी घेईल का? किंवा राजमार्ग माहीत असताना कोणी आडवाटेला जाईल का? 

Monday 12 October 2015

जळी खेळे चंद्र


जळी खेळे चंद्र । असून नभात
तसाच देहात । खेळे भक्त..!

खर्‍या भक्ताचे स्वरूप सांगताना दिलेली उपमा- ‘येरी शरीराचिया सलिलीं । असतेपण हेचि साउली । वाचूनि चंद्रिका ते ठेली । चंद्रीच आहे ॥’ १३८/८ - पाण्यात चंद्र दिसला तरी खरा चंद्र आकाशात असतो त्याप्रमाणे खरा भक्त शरीररूपात दिसत असला तरी तो माझ्याशी एकरूप झालेला असतो.

‘जे जाळ जळी पांगिले । तेथ चंद्रबिंब दिसे आंतुडले । परी थडिये काढूनि झाडिले । तेव्हा बिंब के सांगे ॥’ १३८/९ - पाण्यात जाळं टाकलं तर पाण्यातलं चंद्राचं प्रतिबिंब जाळ्यात अडकल्यासारखं दिसतं. पण काठावर आणून जाळं झटकलं तर चंद्र खाली पडेल का? अडकलेय असं वाटणं हे अज्ञान. ज्ञान झाले की सत्य समजते हे सांगताना ही उपमा दिलेली आहे.

Sunday 11 October 2015

पाण्याचा आवेग


पाण्याचा आवेग । वीज निर्मितसे
पण पाणी नसे । विजेमधे..!

‘पै गगनी उपजे आभाळ । परि तेथ गगन नाहीं केवळ । अथवा आभाळीं होय सलिल । तेथ अभ्र नाही ॥ ‘मग तया उदकाचेनि आवेशे । प्रगटले तेज जे लखलखीत दिसे । तिये विजूमाजी असे । सलिल कायी ॥ ५७, ५८/७
ढगांमधे पाणी असतं पण त्या पाण्यात ढग नसतात... पाण्याच्या ‘आवेशा’मुळे वीज निर्माण होते पण त्या विजेत पाणी असत नाही.. त्याप्रमाणे हे सर्व विश्व जरी माझ्यामुळे निर्माण झाले तरी त्या कशात मी असत नाही. हे समजावताना वरील उपमा दिलेल्या आहेत-

Saturday 10 October 2015

आदिशून्यांचा गाभारा


आदिशून्यांचा की । भरला गाभारा
प्रकृती-पसारा । अनावर..!

शून्यातून सृष्टी कशी निर्माण झाली हे समजावताना दिलेली उपमा-
होती चौर्‍यांशी लक्ष थरा । येरा मिति नेणिजे भांडारा । भरे आदिशून्यांचा गाभारा । नाणेयांसी ॥ (२४/७)
पंचमहाभूते आणि मन बुद्धी अहंकार ही अष्टधा प्रकृती. सूक्ष्म प्रकृतीशी जेव्हा या स्थूल प्रकृतीचा मेळ होतो तेव्हा जीवसृष्टीची टांकसाळ सुरू होते... ८४ लक्ष योनींचे आकार आणि इतर आणखी अगणित आकार यांनी ‘आदिशून्याचा गाभारा’ भरून जातो...

Friday 9 October 2015

सूर्योदयाआधी


सूर्योदयाआधी  । क्षितिज प्रकाशे
अल्पवयी तसे । निजज्ञान..!

मोक्षमार्गातील माणसाला आत्मप्राप्ती होण्याआधीच मृत्यु आला तर त्याला योग्यांच्या कुळात जन्म मिळतो व अल्प वयातच त्याच्या ठिकाणी स्वरूपज्ञानाचा उदय होतो. हे समजावताना दिलेली उपमा-
मोटकी देहाकृती उमटे । आणि निजज्ञानाची पहाट फुटे । सूर्यापुढां प्रगटे । प्रकाशु जैसा ॥ तैशी दशेची वाट न पाहतां । वयसेचिया गांवा न येता । बाळपणीच सर्वज्ञता । वरी तयाते ॥ ४५२,४५३/६ सूर्योदयापूर्वी तो येत असल्याची ग्वाही देत प्रकाश येतो तसा मनुष्यजन्म प्राप्त होऊन प्रौढत्व येण्याआधीच त्यास स्वरूपज्ञान प्राप्त होते. 

Thursday 8 October 2015

आकाशी जमती


आकाशी जमती  | विरळसे ढग
धरेनात तग  | वर्षेनात..!

‘जैसे अकाळी आभाळ । अळुमाळु सपातळ । विपाये आले केवळ । वसे ना वर्षे ॥’ ४३४/६
थोडे विरळ ढग अकाळी चुकून गोळा झाले तरी ते टिकत नाहीत आणि बरसतही नाहीत.
श्रद्धाळू व्यक्ती प्रयत्नपूर्वक योगसाधना न करताच मोक्षाच्या मार्गाला जाऊ लागते.. त्याला मोक्ष तर मिळत नाही पण श्रद्धा असल्यामुळे आत्मप्राप्तीची आशाही सोडवत नाही. अशा मधल्या अवस्थेचे वर्णन करण्यासाठी ही उपमा दिलेली आहे. अशा माणसाला कोणती गती प्राप्त होते असा प्रश्न पुढे अर्जून विचारतो..

असंख्यात पाने


असंख्यात पाने । एकलेच रोप  
अव्दैतात झोप । ज्ञानियाला..!

‘ना तरी वृक्षाची पाने जेतुली । तेतुली रोपे नाही लावली । ऐसी अव्दैत दिवसे पाहली । रात्री जया ॥ तो पंचात्मकी सापडे । मग सांग पा कैसेनि अडे । जो प्रतीतीचेनि पाडे । मजसी तुके ॥ ४००, ४०१/६
वृक्षाला जेवढी पानं असतात तेवढी रोपं लावलेली नसतात.. असं अव्दैताचं ज्ञान झालं, त्याची खूणगाठ पटलीय अशा अव्दैत दिवसानं व्दैताची रात्र अनुभवली तरी तो व्दैतभावात अडकून राहात नाही.. ‘ज्ञानी’ माणूस पंचमहाभूतात्मक शरीरात असला तरी तो देहभावात अडकून पडत नाही  हे समजावताना ही उपमा दिलेली आहे.

Tuesday 6 October 2015

जिवाच्या भीतीने


जिवाच्या भीतीने | असा अडकला
पंख विसरला | अज्ञानात..!


जैसी ते शुकाचेनि आंगभारे । नळिका भोविन्नली एरी मोहरे । तरी तेणे उडावे परि न पुरे । मनशंका ॥ ७६/६
ज्ञान प्राप्त करून घेण्याची क्षमता असूनही देहभावात लडबडलेला माणूस, उडता येण्यासाठी पंख आहेत हे विसरून आपण पडू या शंकेनं नळीला लोंबकळत राहणार्‍या पोपटासारखा देहात अडकून राहतो.

Monday 5 October 2015

आडकंठ



मनुष्यजन्माचे । सार्थक कराया
कर्माच्या पायऱ्या । चुकू नये..!

कर्म आणि योगमार्गाचा परस्परपूरक संबंध सांगताना दिलेली उपमा-
‘आतां योगाचळाचा निमथा । जरी ठाकावा आथि पार्था । तरी सोपाना या कर्मपथा । चुका झणी ॥’ ‘येणे यमनियमांचेनि तळवटे । रिगे आसनाचिये पाउलवाटे । येई प्राणायामाचेनि आडकंठे । वरौता गा ॥’ ५४,५५/६
योगाच्या पर्वतावर जायचे तर कर्ममार्गाच्या पायर्‍यांनी जावे. यमनियमांच्या पायथ्यापासून आसनांच्या पाउलवाटेने प्राणायामाचा अवघड कडा पार करून वर जावे.