Friday, 12 August 2016

मुक्काम दिसता



                                            मुक्काम दिसता । चालणे सरते
                                  वाट ही नुरते । पायांखाली..!

नाना चालीचिया वाढी। वाट होत जाय थोडी। मग पातला ठायीं बुडी। देऊनि निमे।। ११०२/१८
गाव जवळ आले की वाट थोडी उरते आणि पोचल्यावर बुडून नाहीशी होते

अद्वैत ज्ञान होऊ लागते तशी द्वैताची वाट संपत जाते आणि पूर्ण ज्ञान झाले की नाहीशी होते... हे समजावताना ही उपमा दिलेली आहे.

Sunday, 24 July 2016

सात्विक ते धैर्य..


संकल्प-विकल्प । फेडले लुगडे
निःशंक उघडे । केले मन..!
सात्विक ते धैर्य । आतून उगवे
बुद्धी-चंद्रामागे । उगी राही..!

जे जे आहे ते सर्व त्रिगुणात्मक आहे. याचे तपशीलवार वर्णन करताना सात्विक धैर्यासंदर्भात ही उपमा दिलेली आहे.

अधोर्ध्व गुढें काढी । प्राण नावाची पेंडी । बांधोनी घाली उडी । मध्यमेमाजी ॥
संकल्प-विकल्पांचें लुगडे । सांडूनि मन उघडें । बुद्धीही मागिलेकडे । उगीचि बैसे ॥ ७३९, ४० / १८

जे धैर्य प्राण..अपान.. आदि नऊ वायुंची जुडी करून नंतर सुषुम्नेमधे उडी घेते, संकल्प-विकल्पांचें वस्त्र उतरवून मन उघडे करते आणि बुद्धीच्या मागे जाऊन निवांत बसते.. असे धैर्य ते सात्विक धैर्य..!

Thursday, 21 July 2016

गर्जनेशिवाय..



गर्जनेशिवाय । वर्षाकाली धुंद
वर्षे मेघवृंद । सात्विकसा..!

कर्मेकराणारा सात्विक कर्ता कसा असतो ते सांगताना दिलेली उपमा-

परि फलशून्यता । नाहीं तया विफळता । पैं फळासीचि पांडुसुता । फळें कायसी ॥
आणि आदरे करी बहुवसें । परी कर्ता मी हे नुमसे । वर्षाकाळीचे जैसें । मेघवृंद ॥ ६३३, ३४/१८


नित्यनैमित्तिक कर्मे ही स्वतःच फलस्वरूप असतात. त्यामुळे ती निष्फळ होण्याचा प्रश्नच नाही. फळांनाच फळं असणं नसणं हे कसं शक्य होईल? वर्षाकालातील मेघवृंद गर्जना न करता बरसत असतात तसा सात्विक कर्ता गाजावाजा न करता कर्तव्यबुद्धीने नित्यनैमित्तिक कर्मे करत असतो. मी कर्ता हेही तो जाणत नाही..!

Saturday, 2 July 2016

वारा जाई दूर..


वारा जाई दूर । झाड ओलांडून
डोलणे ठेवून । फांद्यांवर..!

मी कर्मांचा कर्ता आहे असा अहंकार ज्याला नाही, जो यापासून अलिप्त आहे त्याचं स्वरूप समजावताना ही उपमा दिलेली आहे.

ऐसोनि अहंकृतिभावो । जयाचा बोधी जाहला वावो । तर्‍ही देहा जंव निर्वाहो । तंव आथी कर्में ॥ आगा वारा जरा वाजोनि वोसरे । तरी तो डोल रुखी उरे । कां सेंदे दृति राहे कापुरें । वेंचलेनी ॥ ४२२, २३ / १८

जसा वारा झाड पार करून दूर निघून गेला तरी त्यामुळे झाडाच्या फांद्यांमधे निर्माण झालेला कंप, त्यामुळे त्यांचे हलणे काही काळ मागे राहते किंवा डबीमधे ठेवलेला कापूर संपला तरी त्याचा गंध काही काळ डबीत रेंगाळत राहतो तसे स्वरूप ज्ञान झालेली व्यक्ती कर्म-प्रक्रियेपासून अलिप्त झाली तरी देह आहे तोपर्यंत त्याच्या असण्यामुळे कर्मे होतच राहतात..!

Monday, 27 June 2016

आकाश वर्षते..


आकाश वर्षते । डबकी बिंबते
तदाकार होते । असीम जे..!

कर्मं अखंड घडत असतात. कृष्ण त्यांची कारणं अर्जुनाला समजावून सांगत आहे. पहिलं कारण देह. दुसरं जीव. जीवाचं स्वरूप समजून देताना ही उपमा दिलेली आहे.

आणि कर्ता ते दुजें । कर्माचें कारण जाणिजे । प्रतिबिंब म्हणिजे । चैतन्याचें जें ॥ ३२१/१८
‘आकाशचि वर्षे नीर । तें तळवटीं बांधे नाडर । मग बिंबोनि तदाकार । होय जेवीं ॥ ३२२/१८’
तैसें आपुलेनि विसरें । चैतन्यचि देहाकारें । आभासोनी आविष्कारे । देहपणें जें ॥ ३२४/१८
जया विचाराचां देशीं । प्रसिद्धी गा जीवु ऐसी । जेणें भाक केली देहेंसीं । आघवाविषयी ॥ ३२५/१८

आकाश पर्जन्याचा वर्षाव करतं. त्याचं पृथ्वीवर डबकं तयार होतं. आणि असीम असलेलं आकाश डबक्याच्या आकाराचं होतं. तसे चैतन्य देहाकार धारण करून कर्मरूपात व्यक्त होत राहातं. आणि ‘स्व’रूपाचा विसर पडून ‘मी देह आहे’ असं मानू लागतं. अशी विपरित समजूत करून घेतलेले चैतन्य म्हणजे जीव. या जीवाने अवघी कर्मे करण्याबाबत देहाशी करार केलेला आहे..!

Sunday, 8 May 2016

निराकार जरी..


निराकार जरी । विश्वरूप घेई
परमाणू होई । गगन हे..!

दैवी संपत्ती असलेले गुण कोणते याचे वर्णन चालले आहे. त्यात मार्दव या गुणाचे स्वरूप समजावून सांगतांना दिलेली उपमा.

परी महाभूतें पोटीं वाहे । तेवींचि परमाणूमाजीं समाये । या विश्वानुसार होये । गगन जैसे ॥
काय सांगों ऐसें जिणें । जें जगाचेनि जीवें प्राणें । तया नांव म्हणें । मार्दव मी ॥ १७३ १७४ / १६

आकाश असीम आहे. पण ते पंचमहाभूते पोटात धारण करते तसे परमाणूरूपातही सामावते. ‘स्व’ मधे न आणता जसे विश्व आहे तसे ते होते. त्याप्रमाणे ‘स्व’ बाजूला ठेवून जीवमात्रांसाठी जगत राहणे या गुणाला मी मार्दव म्हणतो.

Saturday, 30 April 2016

देह अहंतेचे..


देह अंहतेचे । घरकुल सोडे
चिदाकाशी उडे । जीवपक्षी..!

सोळाव्या अध्यायाच्या सुरुवातीलाच ही उपमा आलेली आहे.
जेणे विवळतिये सवळे । लाहोनि आत्मज्ञानाचे डोळे । सांडिती देहाहंतेचीं अविसाळें । जीवपक्षी ॥ २/१६

नेहमीचा सूर्योदय विश्व उजेडात आणतो. एका अर्थी तो द्वैताचे दर्शन घडवतो. पण मायेच्या, अज्ञानाच्या रात्रीचा नाश करून आत्मज्ञानाचा सूर्य  उगवला की अध्यात्मज्ञानाचा दिवस उगवतो. अशा प्रातःकाळी आत्मज्ञानाची दृष्टी प्राप्त होऊन जीवपक्षी ‘मी म्हणजे देह’ या समजुतीचे घरटे सोडून देतात..