Saturday, 26 September 2015

तरंग होऊन


तरंग होऊन । स्वतःशीच खेळे
जळी जळ लोळे । स्वानंदात..!


हे असो पवनाचेनि मेळें। जैसे जळींचि जळ लोळे । ते आणिकें म्हणती वेगळे । कल्लोळ हे ॥१००/५

जसे वार्‍यामुळं तरंग निर्माण होतात. ते तरंग म्हणजे मुळात पाणीच असतं पण पाहणार्‍याला पाणी आणि तरंग वेगळे वाटतात. तसे विश्वाचे मूळ स्वरूप एक आहे. अज्ञानामुळे सर्वत्र वेगळेपण जाणवते हे समजावून सांगताना ही उपमा दिलेली आहे. 

Thursday, 24 September 2015

पूर्वेच्या राउळी


पूर्वेच्या राउळी । सूर्याची दिवाळी
फिटली काजळी । अवघीच..!


अज्ञान नाहीसे होऊन संभ्रम दूर झाल्यावर द्वैतभाव उरत नाही. एकत्वाची लख्ख प्रचिती येते हे सांगत असताना दिलेली उपमा-
जैशी पूर्वदिशेचां राउळीं । उदयाची सूर्ये दिवाळी । कीं येरींहि दिशा तियेचि काळीं । काळिमा नाही ॥ (८६/५)
पूर्व दिशेच्या राउळात सूर्योदयाची दिवाळी झाली की सर्वच दिशातील काळोख नाहीसा होतो.

Wednesday, 23 September 2015

विवेकतरू


विवेकतरूंचे । अनोखे उद्यान
करावे जतन । ज्याचे त्याने..! 


“ आतां अवधारा कथा गहन । जे सकळा कौतुकां जन्मस्थान । कीं अभिनव उद्यान । विवेकतरूचे ॥ २८/१ ”

कथा म्हणजे महाभारत कथा. ती गहन आहे, सगळ्या चमत्कारांचे जन्मस्थान आहे.. आणि ती ‘विवेकतरू’चे उद्यान आहे.

या कथेत असंख्य उपकथा आहेत. त्यांचं प्रयोजन जाणून घेण्यासाठी विवेकाची आवश्यकता आहे. विवेकतरूचे उद्यान ही उपमा म्हणजे केवळ प्रासादिकता नाही. तर समजून घेण्याचा तो एक दृष्टीकोन आहे.

Tuesday, 22 September 2015

अमूर्ताचा कडवसा


विश्व अमूर्ताचा । असे कडवसा
चैतन्य-विलासा । पार नाही..!

ज्ञानाचं महत्त्व सांगत असताना दिलेली उपमा-

देखें विश्वभ्रमाऐसा । जो अमूर्ताचा कडवसा । तो जयाचिया प्रकाशा । पुरेचिना ॥ (१७४/४)
कडवसा म्हणजे पडछाया.

विश्व म्हणजे निराकाराची केवळ सावली आहे हे ज्ञानी माणसाला सहज उमगतं.. त्याच्या ज्ञानाच्या प्रकाशापुढं हा पसारा काहीच नाही..!